Feb 10, 2025

म्हणी व त्यांचे अर्थ

 

म्हणी व त्यांचे अर्थ

mhani-va-tyanche-arth
mhani-va-tyanche-arth

 

(१) अडला हरी गाढवाचे पाय धरी - एखादया बुद्धिमान, सज्जन माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख, दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते.

(२) अति तेथे माती- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारक ठरतो.

(३) अति शहाणा त्याचा बैल रिकामा - जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो, त्याचे मुळीच काम होत नाही.

(४) असतील शिते तर जमतील भुते - एखादया माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात.

(५) आगीतून फुफाट्यात - एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे.

(६) आधी पोटोबा मग विठोबा - प्रथम पोटाची सोय पाहावी; नंतर देवधर्म, परमार्थ करावा.

(७) आपलेच दात, आपलेच ओठ - आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे अडचणीची स्थिती निर्माण होणे.

(८) आयत्या बिळावर नागोबा - एखाद्याने स्वतः करिता केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.

(९) आंधळं दळतं, कुत्रं पीठ खातं - एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.

(१०) आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.

(११) इकडे आड, तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती.

(१२) उचलली जीभ लावली टाळ्याला - विचार न करता बोलणे.

(१३) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग -अतिशय उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.

(१४) उथळ पाण्याला खळखळाट फार - अंगी थोडासा गुण असणाऱ्या माणसाने जास्त बढाई मारणे.  

(१५) उंदराला मांजर साक्ष - ज्याचा एखादया गोष्टीत हितसंबंध आहे, त्याला त्या गोष्टीबद्दल विचारणे व्यर्थ ठरणे.

(१६) एक ना धड भाराभर चिंध्या - कोणतेही एक काम पूर्ण न करता अनेक कामे एकामागून एक करायला घेणे.

(१७) ऐकावे जनाचे करावे मनाचे - सगळ्यांचा विचार घेऊन जे स्वतःला पटेल तेच करावे.

(१८) काखेत कळसा गावाला वळसा - भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे.

(१९) कानामागून आली आणि तिखट झाली - मागून येऊन वरचढ होणे.

(२०) कामापुरता मामा - काम करून घेताना गोड बोलणे आणि काम झाले की त्याला विसरून जायचे.  

(२१) कोल्हा काकडीला राजी - क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनीही खूश होतात.

(२२) कोळसा उगाळावा तितका काळाच - वाईट गोष्टीबाबत कितीही ऊहापोह केला, तरी ती वाईटच ठरते.

(२३) खाण तशी माती - आईबापांप्रमाणे त्यांची मुले निपजणे.

(२४) गर्जेल तो पडेल काय - केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीही घडत नाही.

(२५) गरज सरो, वैदय मरो - एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपली की त्याला ओळखही न दाखवणे.

(२६) गरजवंताला अक्कल नसते - एखादी न पटणारी गोष्टसुद्धा गरजू माणसास वेळप्रसंगी मान्य करावी लागते.

(२७) गर्वाचे घर खाली - फुशारकी मारणाऱ्याचे कधीतरी गर्वहरण होते.

(२८) गाढवाला गुळाची चव काय - ज्याला एखाद्या गोष्टीबाबत काहीच माहीत नाही, त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.

(२९) गोगलगाय अन् पोटात पाय - बाहेरून गरीब दिसणारी; पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती.

(३०) घरोघरी मातीच्या चुली - सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असते.

(३१) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे - प्रत्येकाला केव्हातरी परिस्थिती अनुकूल होतेच.

(३२) चोर सोडून संन्याशाला फाशी – खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा होणे.

(३३) चोराच्या उलट्या बोंबा - स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरडणे.

(३४) चोराच्या मनात चांदणे वाईट - कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय, अशी सारखी भीती वाटत असते.

(३५) चोरावर मोर - एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर वरकडी करणे.

(३६) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही - मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.

(३७) ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी - समान शीलाच्या माणसांनी एकमेकांची वर्मे काढण्यात अर्थ नसतो; कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात.

(३८) ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी - जो आपल्यावर उपकार करतो, त्याचे (उपकारकर्त्याचे) उपकार स्मरून त्याचे गुणगान गावे.

(३९) ज्याच्या हाती ससा तो पारधी - ज्याच्या हाती पुरावा किंवा वस्तू त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते; म्हणजेच एकाचे कर्तृत्व; पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे.

(४०) झाकली मूठ सव्वा लाखाची - गुप्त ठेवण्याजोगे गुप्तच ठेवावे, व्यंग नेहमी झाकून ठेवावे.

(४१) टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही - कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही.

(४२) तळे राखी तो पाणी चाखी - ज्याच्याकडे एखादे काम सोपवलेले असेल, तो त्यातून स्वतःचा काहीतरी फायदा उठवणारच.

(४३) ताकापुरती आजीबाई - आपले काम होईपर्यंत एखादयाशी गोड बोलणे.

(४४) तेल गेले, तूप गेले, हाती राहिले धुपाटणे - दोन फायदयाच्या गोष्टी असता, मूर्खपणामुळे हातच्या दोन्ही जाऊ देऊन हाती काहीच न लागणे.

(४५) तोंड दाबून बुक्क्यांचा मार - एखादयाला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही मोकळा न ठेवणे.

(४६) थेंबे थेंबे तळे साचे - दिसण्यात क्षुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा हळूहळू संग्रह केला असता, कालांतराने वस्तूंचा मोठा संचय होतो.

(४७) दगडापेक्षा वीट मऊ - निरुपाय म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट पत्करणे.

(४८) दुरून डोंगर साजरे - कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यानंतर तिचे खरे स्वरूप कळते.

(४९) नव्याचे नऊ दिवस - कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे.

(५०) नाक दाबले की तोंड उघडते - एखादया माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य त्या दिशेने दबाव आणला की चुटकीसरशी, ताबडतोब हवे ते काम करून घेता येते.

(५१) नाकापेक्षा मोती जड - मालकापेक्षा नोकराची मिजास अधिक.

(५२) नाचता येईना, अंगण वाकडे - आपल्याला एखादे काम करता येत नसेल, तेव्हा आपला कमीपणा झाकण्याकरिता संबंधित गोष्टीत दोष दाखवणे.

(५३) नाव मोठं, लक्षण खोटं - बाहेरचा भपका मोठा; पण कृतीच्या नावाने शून्य.

(५४) नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा - नाव मोठे; पण कर्तृत्व कमी प्रतीचे.

(५५) नावडतीचे मीठ अळणी - आपल्या नावडत्या माणसाने केलेली कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली, तरी ती आपल्याला वाईटच दिसते.

(५६) पदरी पडले पवित्र झाले - कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नावे ठेवू नयेत, तिच्या बाबतीत समाधान मानावे.

(५७) पळसाला पाने तीनच - सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.

(५८) पाचामुखी परमेश्वर - बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानावे.

(५९) पालथ्या घागरीवर पाणी - केलेला उपदेश निष्फळ ठरणे.

(६०) पी हळद, हो गोरी - कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे.

(६१) पुढच्यास ठेच मागचा शहाणा - दुसऱ्याचा अनुभव पाहून त्यावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो.

(६२) बडा घर पोकळ वासा - दिसण्यास श्रीमंती; पण प्रत्यक्षात तिचा अभाव.

(६३) बळी तो कान पिळी - बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवतो.

(६४) बाप तसा बेटा - बापाच्या अंगचे गुणच मुलात उतरणे.

(६५) बुडत्याचा पाय खोलात - ज्याचा अपकर्ष व्हायचा असतो, त्याला सतत अपयशच येत जाते.

(६६) बुडत्याला काडीचा आधार - घोर संकटाच्या प्रसंगी मिळालेली थोडीशी मदतदेखील महत्त्वाची वाटते.

(६७) बैल गेला अन् झोपा केला - एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.

(६८) भरवशाच्या म्हशीला टोणगा - खूप आशा वाटणाऱ्याच्या बाबतीत संपूर्ण निराशा होणे.

(६९) मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये - कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तसा फायदा घेऊ नये.

(७०) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात - लहान वयातच व्यक्तीच्या मोठेपणाच्या गुण-दोषांचे दर्शन होते.

(७१) यथा राजा तथा प्रजा - प्रमुख माणसाच्या आचार-विचारांप्रमाणेच त्याच्या अखत्यारीतील इतर माणसांचे आचार-विचार असतात.

(७२) रोज मरे त्याला कोण रडे - तीच तीच गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य जाते व तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही.

(७३) लेकी बोले सुने लागे - एकाला उ‌द्देशून; पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.

(७४) लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण - लोकांना उपदेश करायचा; पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही.

(७५) वरातीमागून घोडे - एखादी गोष्ट होऊन गेल्यावर मागाहून तत्संबंधीची साधने जुळवणे व्यर्थ असते.

(७६) वासरांत लंगडी गाय शहाणी - मूर्ख माणसांत थोडेसे ज्ञान असणाराही शहाणा ठरतो.

(७७) विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर - गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे.

(७८) शहाण्याला शब्दांचा मार - शहाण्या माणसाला समजावून सांगितल्यास तो ताळ्यावर येतो.

(७९) शितावरून भाताची परीक्षा - वस्तूच्या लहानशा भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे.

(८०) सगळे मुसळ केरात - महत्त्वाच्या मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे केलेले सर्व श्रम व्यर्थ जातात.

(८१) सुंभ जळाला तरी पीळ जात नाही - हट्टी मनुष्याचे हट्टामुळे नुकसान झाले, तरी त्याचा हट्ट नाहीसा होत नाही.

(८२) हत्ती गेला, शेपूट राहिले - कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि अल्पसाच व्हायचा राहिला.

(८३) हातच्या कंकणाला आरसा कशाला - स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Names of fruits in English

Hello, kids! Welcome to our blog. Today, we will learn the names of fruits in English ! Fruits are delicious and healthy! Let’s start!...